राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब यांना रविवारी सायंकाळी पोटदुखीमुळे अस्वस्थ वाटत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांच्या पित्ताशयात दोष निर्माण झाल्याचे निदान झाले आहे.
पवार साहेबांवर ३१ मार्चला एंडोस्कोपी नंतर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे त्यांचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी दिली.
दरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वर पोस्ट करत पवार साहेब संकटावर मात करतील हा विश्वास असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, ‘अनेक शारीरीक संकटांवर मात करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम पवार साहेबांनी अनेकवेळा केलं आहे. याही वेळेस सामोरे आलेल्या संकटावर ते मात करतील हा माझाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे. साहेब, लवकरच बरे होऊन पुन्हा आपल्या सगळ्यांमध्ये सामील होतील,’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.