शरद पवारांनी घेतला कोरोना लशीचा दुसरा डोस; जनतेला ‘या’साठी केलं आवाहन

15

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोविड-१९ लशीचा दुसरा डोस घेतला. दि. १ मार्च रोजी शरद पवारांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एक महिन्याने त्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

योगायोग म्हणजे आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य दिनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारच्या नियमानुसार प्रत्येकाने आपापले लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन पवारांनी यावेळी केले.

जे.जे. रुग्णालयाच्या परिचारिका श्रद्धा मोरे यांनी लस दिल्याबद्दल पवार साहेबांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय पथक उपस्थित होते. तसेच डॉ. लहाने यांना रुग्णालयाच्या ग्रंथालयासाठी साहेबांनी आपल्या संग्रहालयातले पुस्तक भेट दिले.