पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत लढल्याने भारतीय जनता पार्टी ला आपल्या हक्काच्या नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. महाविकास आघाडीच्या या विजयावर सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
“तीन पक्ष एकत्र आले तर बहुजन समाजाची ताकद किती वाढू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा विजय आहे. सहा पैकी सहा सीट निवडून येतील असे म्हणणाऱ्या मंडळींना एका सीटवर समाधान मानावं लागलं. आणि एक आपक्ष निवडून आला. बाकी चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. आदरणीय शरद पवारांचे धोरण आणि तीन पक्षाच्या धोरणामुळे हा विजय मिळाला”. असे श्रीनिवास पाटील यांनी म्हटलं आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच महाविकास आघाडीचे यश उत्तरोत्तर वाढत जावो हीच अपेक्षा त्यांनी मतदारांकडे बोलून दाखवली.