शिर्डी संस्थानने सामाजिक बांधिलकी जपली; ‘या’साठी मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

9

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सीजनसाठी इतरांवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करणे आणि राज्याची असणारी दैनंदिन तीन हजार मेट्रीक टन ऑक्सीजन निर्मिती राज्यातच होईल, यासाठी प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा सामान्य रुग्णालय शिर्डी येथे मेडीकल ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळा कार्यान्वयन चाचणी सोहळा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या रुग्णांना ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच अशा ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले. आपल्या राज्यासाठी आवश्यक ऑक्सीजन निर्मिती राज्यातच व्हावी यासाठी ठिकठिकाणी असे प्रकल्प उभारणी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.