शिवसेनेच्या वतीने अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी पांडुरंग सकपाळ यांनी दिली होती. त्यानंतर शिवसेनेवर विरोधकांनी टीका केली होती. शिवसेना आता सेक्युलर झाली आहे, असं शिवसेनेनं जाहीर करून टाकावं,असे भाजपने आव्हान दिलं होतं. त्यालाच शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हणजेच सामनातून प्रतिउत्तर देण्यात आलं आहे.
शिवसेनेने ‘अजान’प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत, त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुरम्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा, असं मत सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे.
स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे, असंही टीकास्त्र शिवसेनेनं सोडलं.