महापालिकेच्या ‘या’ विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक आज मुख्यमंत्र्याच्या दारी.

96

एकीकडे भाजपकडून विकासकामांचे नारळ फोडण्याची तयारी होत आहे, तर दुसरीकडे भाजपच्या कामांचा पर्दाफाश करण्याबरोबरच आगामी निवडणुकीत सक्षम पक्ष म्हणून शिवसेनेला मतदारांसमोर आणण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. पुढील वर्षाच्या सुरवातीला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीची रणनीती आखण्याबरोबरच चार वर्षांत नगरसेवकांनी केलेली कामे, भविष्यातील प्रस्तावित कामे व कुठल्या मुद्यावर निवडणूक लढवायची, याविषयांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक शनिवारी (ता. १६) दुपारी चारला होणार आहे.

शिवसेनेला संधी असूनही सत्ता न मिळाल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले होते. त्याचवेळी निवडणुकीतील चुका शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या२०१९ मध्ये शासनाने एकसदस्यीय प्रभाग रचनेचा कायदा केला असला, तरी ५० टक्के महिला आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर द्विसदस्यीय प्रभाग रचनेचा नगरसेवकांचा आग्रह आहे. बैठकीत याविषयावर चर्चा होईल. 

खासदार संजय राऊत यांच्याकडे नाशिकमधील प्रश्‍नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार ही बैठक होत आहे. चार वर्षांत सत्ताधारी भाजपकडून झालेल्या चुका प्रकर्षणाने मतदारासंमोर मांडणे, राज्यातील सत्तेच्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच रिक्त पदे भरणे, महापालिकेसाठी निधी देणे आदी विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, गटनेता विलास शिंदे, वसंत गिते, सुनील बागूल, दत्ता गायकवाड, सत्यभामा गाडेकर आदींसह नगरसेवक बैठकीत सहभागी होतील.