उस्मानाबादमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या पॅनलच्या १७ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. १९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत बलसूर येथील १९ पैकी १७ उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्यामुळे शिवसेनेच्या पॅनलला निवडणुकीआधीच पराभव स्वीकारावा लागला आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या बलसूर गावात शिवसेनेच्या १७ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. ऐनवेळी १७ उमेदवारांचा अर्ज बाद ठरल्याने इच्छुकांची मोठी तारांबळ उडाली. यासंदर्भात सदरील अर्जदारांनी न्यायालयाचे दार देखील ठोठावले आहे. एकूण ४३ अर्ज पाच प्रभागातील १५ जागांसाठी आले होते. यापैकी १७ अर्ज अवैध ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
उमेदवारी अर्जावर अनुक्रमांक व प्रभाग क्रमांक चुकीचा देणे, साक्षीदार सही घेतली नसल्याचे कारण देत, त्याचबरोबर अपत्य स्वयंघोषणापत्र नसणे, अशिक्षित असल्याचे शपथपत्र न देणे, ठेकेदारी करत नसल्याचे स्वयंघोषणापत्र नसणे, परिशिष्ट दोनची नोटरी नसल्याच्या कारणावरून हे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या गटाला झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या पॅनलचा एकहाती विजय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.