कोरोना संक्रमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या ‘त्या’ योद्ध्यांचा शिवसेनेद्वारे जोरदार सत्कार

7

परभणी शहरासह जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणार्‍या त्या आठ योद्ध्यांचा येत्या रविवारी शिवसेनेद्वारे यथोचित सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी दिली.

गेल्या वर्षभरापासून शहरासह जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर सर्व सोपास्कार पूर्ण करीत अंत्यसंस्कार करणारे महापालिकेअंतर्गत रुग्णवाहिकेच्या चालकासह एकूण आठ कोरोनायोद्धे इमानेइतबारे अहोरात्र कर्तव्य बजावित आहेत.

विशेषतः हे कोरोनायोद्धे या अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचा काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आहेत. मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांच्या भावनांचीसुध्दा दखल घेत आहेत. संवेदनशिल असणार्‍या या विषयात या योद्ध्यांनी आतापर्यंत कर्तव्यात तसूभरसुध्दा दिरंगाई केली नाही. तक्रारसुध्दा येवू दिली नाही. महापालिकेचे हे कोरोनायोद्धे कोणत्याही तक्रारीविना सेवा बजावित आहेत.

या योद्ध्यांनी आतापर्यंत जवळपास हजार मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांच्या या अभूतपूर्व कामाची खासदार जाधव यांनी दखल घेवून रविवारी सायंकाळी 5 वाजता वसमत रस्त्यावरील संपर्क कार्यालयासमोर या योद्ध्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. त्याद्वारे या कोरोनायोद्ध्यांना शहरासह जिल्हावासीयांच्यावतीने आपण सलाम करणार आहोत, असे खासदार जाधव यांनी सांगितले.