“याअगोदर राज्यात युतीचे सरकार होते. मात्र या शिवसेना- भाजप युतीमध्ये शिवसेनेला काही स्कोपच नव्हता. ते सरकार केवळ भाजपचे होते. भाजपचे एककलमी धोरणच तेव्हा चालायचे” असे विधान राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रबादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त जळगाव येथील चोपडा याठिकाणी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची पाठराखण करत भाजपवर निशाणा साधला आहे.
२०१४ मध्ये राज्यात मोठा भाऊ-छोटा भाऊ करत युतीचे सरकार आले होते. त्यानंतरच्या या सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांमध्ये कायम खटके उडाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. भाजपाला बहूमत असल्यामुळे शिवसेनेला गृहीत न धरताच भाजपचे नेते निर्णय घ्यायचे. यावरुन शिवसेनेतील नेते संतापून भाजपवर टीका करायचे. त्यामुळे सत्तेतील हे पक्षच एकमेकांविरोधात विरोधी पक्षाची भूमिका निभावत होते. दरम्यान भाजपच्या एककलमी धोरणांचा, निर्णयप्रक्रियांचा मुद्दा हेरत पाटील यांनी भाजपवर निशाना साधला आहे. “मागील सरकार हे केवळ भाजपचे सरकार होते. शिवसेनेला कुठल्याही प्रक्रियांत सामावून घेण्याची त्यांची कुठलीही ईच्छा नसायची. शिवसेनेवर त्यांनी कायम अन्याय केला आहे.” असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यक्रमानिमित्त जयंत पाटील हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे. यावेळी ते जळगाव जिल्ह्यात असतांना चोपडा शहरातील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चोपड्याच्या आमदार लता सोनवणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, चंद्रहास गुजराथी, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे आदी उपस्थित होते.
“विरोधक सतत विचारणा करत असतात. स्वातंत्र्योत्तर काळात आम्ही या देशात काय केले. मी त्यांना सांगू ईच्छितो की, गेल्या ४० वर्षांत देशात खूप मोठे बदल झाले आहेत. ज्या ठिकाणी लोक चालत होते, सायकलवर होते. तेच लोक कारमध्ये आले आहेत. देशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक काळ राज्य केले आहे. गेल्या काळात देशात जी स्थित्यंतरे घडली, तो बदल म्हणजेच आमचे काम आहे.” असेदेखील जयंत पाटील यावेळी म्हणाले.