तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होऊन नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांच्या छपरावर झाडे पडून छपराची कौले फुटून नुकसान झाले. कोरोनामुळे आधीच नागरिक आर्थिक संकटात सापडले असतानाच तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या घराच्या नुकसानीचा फटका नागरिकांना बसला आहे.
नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हे निदर्शनास येताच नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आ.वैभव नाईक धावून आले असून त्यांनी तातडीने आज मालवण येथे स्वखर्चाने ५ हजार कौलांचे वाटप केले.
पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे कौले उपलब्ध करून वैभव नाईक यांनी संकटकाळात केलेल्या मदतीबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मालवण शिवसेना शाखा येथे नागरिकांना कौलांचे वाटप नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.