पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक काही दिवसांमध्ये होणार आहे. बिहार निवडणुकांनंतर शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
शिवसेना कोलकाता, हुगळी, दमदमसह अनेक भागांत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते. निवडणूक लढण्याचा अंतिम निर्णय २९ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत होणार आहे. सदरील वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.
यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ‘शिवसेना पश्चिम बंगालमध्ये लढणार ही आनंदाची गोष्ट आहे. कारण शिवसेनेनं एक रेकॉर्ड बिहारमध्ये तयार केलं आहे. नोटापेक्षा कमी मतं मिळवण्याचा बिहारमधील रेकॉर्ड आम आदमी पक्ष कडे होता. हा रेकॉर्ड शिवसेनेनं मोडला आहे. आता बंगालमध्ये ह्यापेक्षा मोठा रेकॉर्ड शिवसेना तयार करेल,’ अशी उपहासात्मक टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.