रत्नागिरी-राजापुर येथील नाणार प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून जाणे, महाराष्ट्राला परवडणारे नाही. अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मांडली आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प ऊभारण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी असे या पत्रात नमुद केले आहे. मात्र शिवसेनेचे रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी “हिम्मत असेल तर स्थानिक नाणारवासियांच्या विरोधाला सामोरे जा” असे म्हणत राज ठाकरेंनाच खडे बोल लागवले आहेत.
नाणार प्रकल्पासाठी कोकणातील स्थानिक लोकांचा तीव्र विरोध होता. परिणामी ऊद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे यांनी पुन्हा हा प्रकल्प सुरु करण्याची मागणी केली आहे. मात्र विनायक राऊत यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
मागे राज ठाकरे यांनी स्वत: कोकणार येऊन नाणार प्रकल्प होऊ देणार नाही अशी घोषणा केली होती. आता अचानक त्यांचे मतपरिवर्तन झाले आहे. २२१ गुजरातींनी येथील जमिन खरेदी केली आहे. कदाचित त्यांचे भले व्हावे यासाठी तर त्यांची ही भूमिका नाही ना? असा सवालसुद्धा विनायक राऊत यांनी यावेळी ऊपस्थित केला. एका खाजगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
स्थानिक लोकांमध्ये या प्रकल्पास विरोध करणार्यांची संख्या हजारोंमध्ये आहे. हिंमत असेल तर राज ठाकरेंनी या स्थानिक लोकांना सामोरे जावे आणि त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडावी असे आव्हानच विनायक राऊत यांनी यावेळी दिले. तसेच रीफायनरी प्रकल्प हा महाराष्ट्रातच होणार पण तो नाणारलाच होणार का? हे मात्र निश्चित नाही. असेसुद्धा ते यावेळी म्हणाले.