राज्यातील आदर्श गाव अशी ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोद्यात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. पाटोड्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे यांनी भेट घेतली. त्यावेळी नवनिर्वाचीत सदस्यांचा दानवे यांनी सत्कार केला.
निवडून आलेल्या सदस्यांमध्ये कपिंद्र पेरे, पुष्पा सोमीनाथ पेरे ,सुनिता कृष्णा पेरे, बब्बाभाई कैलास पेरे, पुनम गाडेकर, मिरा जाधव, शामल थटवले ,लक्ष्मण मातकर, छाया पवार, जयश्री दिवेकर, मंदा खोकड असे ११ पैकी ११ शिवसेनेचे सदस्य पाटोद्यात निवडून आले आहेत. यावेळी आमदार अंबादास दानवे म्हणाले की, आदर्श गाव असलेल्या पाटोदा गावाची परंपरा कायम ठेवावी. समाजाच्या हिताचे, जनतेचे कार्य करण्यास प्राधान्य द्यायचा कानमंत्र त्यांनी सदस्यांना दिला.
राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात भास्करराव पेरे पाटील यांनी माघार घेतल्याने यंदा तिथे शिवसेनेला मोठं यश मिळालं आहे. भास्करराव पेरे यांनी पाटोदा गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. आता त्याच पद्धतीचे विकासकामे पुढे सुरू राहतील असा विश्वास नवनिर्वाचित सदस्यांनी व्यक्त केला.