‘रंगीला गर्ल’च्या हाती शिवबंधन, उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार ?

3

प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या म्हणजेच मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट उर्मिला मातोंडकर घेणार असल्याचं कळतंय. मात्र, भेटीची वेळ अद्याप ठरलेली नाही. उद्या दुपारी ४ वाचता उर्मिला मातोंडकर पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर अंतर्गत वादामुळे त्यांनी सहाच महिन्यात काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उर्मिला उद्या शिवबंधन हाती बांधणार असल्याचं नक्की झालं आहे. उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, राजकीय समज आणि राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठीचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवल्याचं म्हटलं आहे.