राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुप्रियाताई सुळे यांना संसद महारत्न तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. जनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देशात अव्वल ठरले आहेत.
खा. सुळे आणि खा. कोल्हे यांच्या संसदेतील कामाची दखल घेत चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊँडेशनतर्फे खा. सुप्रियाताई सुळे यांना संसद महारत्न तर डॉ. अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २० मार्च रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
लोकसभा सभागृहात सुप्रियाताईंनी ९६ टक्के उपस्थिती नोंदवत १५२ चर्चासत्रात सहभाग घेतला होता. तसेच ११८६ प्रश्न उपस्थित करून २२ खासगी विधेयकांवर सुळे यांनी मते मांडली. त्यामुळे त्यांच्या या विशेष कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
तसेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी १४ चर्चासत्रांत सहभाग घेतला असून २७७ प्रश्न उपस्थित केले आहेत. सुप्रियाताई सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांचे या सन्मानाबद्दल राष्ट्रवादी पक्षाने दोघांचं अभिनंदन केलं आहे.