मालवण शहरातील भाजी मार्केट मधील वादग्रस्त गाळा हटवण्यासाठी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. नगरपालिकेच्या मालकीच्या या गाळ्यामध्ये नियमानुसार पोटभाडेकरू ठेवता येत नाही. तरीपण तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी नियम डावलून एका नगरसेवकाला बियर शॉपीसाठी हा गाळा दिला आहे. पंधरा दिवसात नगरपालिकेची नोटीस प्रक्रिया पूर्ण होऊन हा गाळा न पाडल्यास उद्या मी बुलडोजर घेऊन आलो तर मला थांबवू नका, त्यानंतर होणाऱ्या संघर्षाला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा निलेश राणे यांनी दिलाय.
या इमारती मधील सात गाळे खाली करून घेतले जातात. मग एकाच गाळयावर कृपादृष्टी का ? या प्रकारामुळे नगरपालिकेच्या कारभारावर संशय निर्माण झाल्याचे निलेश राणे म्हणाले. दरम्यान उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि भाजपा गटनेते गणेश कुशे यांनी निलेश राणे यांच्या मध्यस्थीनंतर चौथ्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले.
मालवण नगरपालिकेच्या मनमानी काराभाराबाबत उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि गटनेते गणेश कुशे यांनी पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. आजच्या चौथ्या दिवशीही हे उपोषण सुरू होते. यात गटनेते गणेश कुशे यांची प्रकृती आज आणखीनच खालावली होती.
वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांच्यावर उपचार केले. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी आज मालवणला भेट दिली. यावेळी त्यांनी भाजीमंडईतील त्या न पाडलेल्या गाळ्याची पाहणी केली. त्यानंतर पालिकेत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेत चर्चा केली.