नागपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने सन्मानजनक जागा न दिल्यास राष्ट्रवादी सर्व जागा ताकदीनिशी लढवेल असं राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी म्हटलं आहे. नागपूर महानरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राष्ट्रवादीने आत्तापासूनच नागपूर महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी करण्याचं ठरवलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख, खासदरा प्रफुल्ल पटेल यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी आणि छोट्या बैठका सुरु केल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी सोमवारी दिवसभरात सहा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते, तसेच अन्य नेत्यांच्या बैठका घेतल्या आहेत.
“काँग्रेसने सन्मानजनक जागा दिल्या नाही,तर नागपुरातील सर्व जागा लढवू, स्वबळाच्या दिशेने तयारी सुरु आहे” अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली आहे.