प्रासंगिक: पेट्रोलची शतकीय वाटचाल

10

पाहता पाहता पेट्रोलचे भाव प्रति लिटर शंभर रुपयांवर आले आहे. काही शहरात शंभराच्या आसपास असेल पण बहुतांश ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरी गाठले आहे. जनतेला अच्छे दिन बघायला मिळतील म्हणून लोकांनी सत्ता परिवर्तन केले. सुरुवातीचे काही दिवस लोकांना खरंच अच्छे दिन यायले असे वाटले. तेव्हा पेट्रोलचे दर देखील उतरले होते की उतरविले होते तो संशोधनाचा विषय आहे. मात्र नंतर पेट्रोलच्या दराचा आलेख हा चढताच आहे. गेल्या 15 ते 20 वर्षात पेट्रोलचे भाव दुप्पट झाले आहेत. त्या मानाने गाड्यांची संख्या देखील वाढीस लागली. लोकसंख्येच्या तुलनेत गाडी वापरणाऱ्याची संख्या देखील वाढली.

पूर्वी घरात एखादी दुचाकी असायची आणि गावात एखादी चार चाकी वाहन असल्याचे. पण आज तशी परिस्थिती नाही. आज घराघरांत दोन ते तीन दुचाकी झाल्या आहेत आणि पाच घरामागे एकाच्या घरी चार चाकी वाहन झाले आहे. सर्वाना वाहन ही अत्यावश्यक बाब झाली आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजामध्ये वाहन देखील समाविष्ट झाले आहे. कोणत्या गावाला जायचे म्हटले की पूर्वी पायी किंवा बैलगाडीचा वापर होत असे. ज्यासाठी पेट्रोल सारख्या इंधनाची गरज राहत नसे. त्यानंतर लोकांनी ये-जा करण्यासाठी सायकलचा वापर करायला सुरुवात केली. तेव्हा देखील पेट्रोलसारख्या इंधनाची गरज भासत नव्हती. त्याचा वापर कमी असल्याने मागणी कमी होती म्हणून त्याचे भाव देखील कमी होते.

पण आजची स्थिती अशी आहे की शाळा-कॉलेजमध्ये जाणारी मुले देखील सायकलचा वापर न करता इंधनावर चालणाऱ्या गाड्या वापरत आहेत. पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी पुनश्च एकदा सायकलचा वापर वाढविणे आवश्यक आहे. त्याचसोबत इलेक्ट्रिक वाहने किंवा सौर ऊर्जेवर चालणारी वाहने वापरण्यावर भर देऊन पेट्रोल कसे कमी वापरता येईल यावर विचार करणे आवश्यक आहे. माझ्याकडे पैसा मुबलक आहे म्हणून पेट्रोल वारेमाप उडविण्याची वृत्ती बदलली पाहिजे. सध्या समाजात हे चित्र फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. त्याची झळ मात्र सामान्य नागरिकांना सोसावे लागत आहे.

त्याचसोबत अन्य बाबीसाठी देखीक पेट्रोलचा वापर वाढला आहे. जसे की पूर्वी शेतीच्या कामांसाठी बैलाचा वापर केला जात होता. ज्याठिकाणी आज ट्रॅक्टर, मळणीयंत्र असे इंधनावर चालणारी वाहनांचावापर वाढला आहे. दिवसेंदिवस गाई-बैलांची संख्या कमी होत चालली आहे. सन 2000 या वर्षी पेट्रोलचा दर प्रति लिटर मागे 22 ते 25 रु. असा होता. तोच दर 10 वर्षांनी म्हणजे 2010 या वर्षी पेट्रोलचा दर प्रति लिटर मागे 50 ते 55 रु. असा होता तर पुुन्हा 10 वर्षानी आपण पाहतोय पेट्रोलचा दर प्रति लिटर मागे 100 रु. झाले आहे.

घरगुती गॅसच्या बाबतीत देखील असाच काही प्रकार झाला आहे. पूर्वी घरोघरी मातीच्या चुली होत्या. नैसर्गिक लाकडाचा वापर त्यासाठी होत होता. निसर्ग वाचवा असा संदेश देताना नॅचरल गॅसचा वापर वाढवा म्हणून सरकारने गरीबतल्या गरीब महिलांना देखील गॅसची सबसिडी देऊ केली. ग्रामीण भागातील घराघरातून धूर गायब झाले मात्र अनेक जणांच्याया खिशाला चटके देखील लागू लागले, हे ही सत्य स्वीकारावेच लागेल. गॅस ही संपणारे घटक आहे तर लाकूड पुन्हा निर्माण करता येण्यासारखी वस्तू आहे. शालेय अभ्यासक्रमात काय शिकविले जाते तर संपणारे घटक कमी प्रमाणात वापर करा आणि न संपणाऱ्या किंवा पुनर्निर्मिती करता येणाऱ्या वस्तूचा जास्त वापर करा. मात्र प्रत्यक्षात दिसते ते उलटेच. यावर देखील विचार करायला हवा, असे वाटते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्यावर भाव वाढणारच हे आर्थिक गणित आहे. मात्र पेट्रोलचे भाव वाढले की बाजारभाव देखील वाढीस लागतो. हा आजवरचा अनुभव आहे. कारण संपूर्ण बाजार या पेट्रोल-डिझेलवर अवलंबून आहे. कोणत्याही मालाचे वाहतूक करायचे म्हणजे वाहन लागतेच.

वाहन आलं म्हणजे पेट्रोल -डिझेल येणारच, त्याशिवाय गाडी जागेवरून हलतच नाही. त्यामुळे याचे भाव वाढले की इतर बाबीचे भाव वाढू लागतात. त्यामुळे याचे दर कमी करणे आवश्यक आहे. तरच महागाई नियंत्रणात राहू शकते. अन्यथा ही महागाई त्याच समप्रमाणात वाढत राहणार. यामुळे जनसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणार हे मात्र नक्की.

नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769