काँग्रेस पक्षाची अवस्था केविलवाणी झाली असून पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी पक्षसंघटनेत आमूलाग्र बदल करण्याची आणि पक्षाला पूर्णवेळ, लोकांपर्यंत पोहोचण्याची तयारी असलेल्या नेतृत्वाची मागणी पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली होती. पक्षातील असंतुष्ट नेत्यांची भेट घेण्यास काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी मान्यता दिली आहे.
पक्षाध्यक्षांना भेटण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांमध्ये पत्र लिहिणाऱ्यांपैकी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, मनीष तिवारी, आनंद शर्मा, शशी थरूर, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बैठक घडवून आणण्यासाठी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी विशेष प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. गांधी गोव्याहून परत आल्यानंतर कमलनाथ यांनी त्यांची दोन वेळा भेट घेतली होती.यावेळी माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पी चिदंबरम, ए के अँटनी, एआयसीसीचे सचिव के सी वेणुगोपाल हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.