शिक्षकांना सर म्हणायची परंपरा रूढ झाली आणि मास्तर शब्दाचा रुबाब संपला. मास्तर म्हटलं की पिंजरा चित्रपटा- तील रंगेल मास्तर आठवायला लागला आणि ‘मा’ म्हणजे आई आणि ‘स्तर’ म्हणजे दर्जा, अर्थात आईच्या स्तराला जाऊन शिकवणारा मास्तर विस्मरणात गेला. असो, आज मी दोन मास्तरांविषयी बोलणारे…
राज्यात सध्या पदवीधर विधानपरिषद निवडणूक होतेय. एक डिसेंबरला मतदान होणार असून, तीन तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. पण, यंदाची निवडणूक ही आत्तापर्यंतच्या पदवीधर निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. त्याचं कारणही तितकंच रंजक आहे. यंदा दोन मास्तरांनी ही निवडणूक मनावर घेतलीय. मास्तरांनी का एखादी गोष्ट मनावर घेतली की त्याचा पिच्छा मास्तर मंडळी सोडत नसते. त्याचाच अंदाज औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतदारांना येतोय. आणि नेमका त्याचाच, मागोवा या लेखात घेऊया. कोण आहेत ही दोन मास्तरं ? चला तर पाहूया…
पहिला मास्तर म्हणजे पुण्यात स्पर्धा परीक्षेचे क्लास घेणारे सचिन ढवळे आणि दुसरे वर्ध्यात स्पर्धा परीक्षेचे क्लास चालवणारे निलेश कराळे. सचिन ढवळे औरंगाबाद म्हण- जेच मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून तर, नितेश कराळे अपक्ष म्हणून नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडून लढवत आहेत. दोन्ही मास्तरांना स्पर्धा परीक्षा विश्वातील विद्यार्थ्यांचा मोठा, भक्कम पाठिंबा. तेच त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार सुद्धा. सर्वात जास्त पदवीधर कुठं मिळतील असं जर तुम्ही विचारलंच तर त्याचं उत्तर आहे पुण्यात, त्याखालोखाल औरंगाबादमध्ये, आणि महत्त्वाचं म्हणजे ते पदवीधर तिथे काय करतात ? याचं जर उत्तर पाहिजे असेल तर, ते पण सांगतो की, हे घ्या पदवीधर झालेली पोरं पुण्यात mpsc/upsc/बँकिंग किंवा तत्सम स्पर्धा परीक्षेचे क्लास किंवा अभ्यास करतात…
बरं या दोन मास्तरांची दखल घ्याव असं नेमकं काय आहे यांच्यात. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी यांना आपल्या वर्तमानपत्रात किंवा आपल्या चॅनलवर तर नाहीच. पण आपल्या वेबसाईटवर सुद्धा स्थान दिलं नाही. मग मास्तरांचा वाली कोण ? तर तो म्हणजे एकच सोशल मीडिया त्याचं उदाहरण देऊ म्हणताय मग हे घ्या.. मराठवाड्यातील पहिल्या तीन उमेदवारांच्या फेसबुकवरील पेजची लाईक संख्या विद्यमान पदवीधर आमदार सतीश चव्हाण ४९ हजार, शिरीष बोराळकर २६ हजार आणि तिसरा म्हणजे मास्तर सचिन ढवळे ३० हजार ( यातील सचिन ढवळे मास्तरच्या पेजवर सगळ्यात जास्त व्ह्यूज, लाईक, अन शेअर आहेत. ) सांगायचं एकच दोन्ही मास्तरांना मेन स्ट्रिम मीडिया नामक मीडिया मध्ये तितकसं स्थान नाहीय. तरी त्यांचा प्रचार जोरात ते कसा ? घाई नको ! त्याचंही उत्तर सांगतो. आजचा प्रत्येक पदवीधर सोशल मीडियावर ॲक्टीव आहे. प्रत्येक उमेदवाराला पदवीधर मतदारांपर्यंत पोहचायचयं असेल तर सोशल मीडिया शिवाय गत्यंतर नाही. खरा पदवीधर मतदार सोशल मीडियावरच आहे.
आणि दोन्ही मास्तरांनी नेमकेपणाने हे हेरून सोशल मीडियाचा प्रभावी वापर केलाय. पक्षाच्या जाहीर सभेत ९०% अनपड नेतेमंडळी आणि मोजकेच पदवीधर नोंदणीकृत मतदार असतात हे वेगळं सांगणे न लगे….
या दोन्ही मास्तरांनी पदवीधर निवडणूक तळागाळातील माणसांपर्यंत पोहचवली आहे. दोन्ही मास्तरांची आपापल्या मतदारसंघातील प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडलाय. चौकटीत बंदिस्त असलेली पदवीधरांची निवडणूक नेमकी असते तरी काय ? इथून या दोघांनी सुरुवात केलीय. शहराबरोबरच ग्रामीण भागात प्रचार यंत्रणा राबवली. त्यामुळे पदवीधरांचा आमदार असतो. ही भानगड सुध्दा सामान्यांपर्यंत पोहचते आहे. दोघांच्या रूपाने उच्चशिक्षित उमेदवार पदवीधर निवडणुकीत नवीन पर्याय मतदारांना उपलब्ध झाले आहेत. वक्तृत्व कलेवर उत्तम पकड, नेमकी शब्द फेक, स्पष्टपणा, पदवीधर मतदारसंघातील समस्येवर केलेला अभ्यास, समस्या सोडविण्यासाठी दिलेला पदवीध- रांना दिलेला विश्वास आणि साधेपणा ही मास्तरांची बलस्थान आहेत. मास्तरांना मिळणारा प्रतिसाद पाहता यंदा पदवीधर मतदारसंघात धक्कादायक निकाल पाहायला मिळू शकतात.
सचिन ढवळे…
पुण्यात सचिन ढवळे रिजनिंग नावाने अकॅडमी चालवत असलेले सचिन ढवळे स्पर्धा परीक्षा विश्वात गणित आणि बुद्धिमत्ता शिकवणारं विश्वासार्ह नाव आहे. आधीच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्ता डोक्यात घुसत नाही. त्यात ढवळे मास्तरमुळे पोरांना mpsc/upsc मध्ये चांगले मार्क पडायला लागले. स्पर्धा परीक्षा विश्वात सचिन ढवळे नाव अल्पावधीत प्रसिद्ध झालं. अनेक क्लासेस मध्ये ढवळे सर मार्गदर्शनासाठी जात असतात. गेल्या दीड दोन वर्षापासून मराठवाड्यात ढवळे मास्तरांनी ग्राउंड लेव्हलला काम केलं. पदवीधर निवडणूक लढण्याची सचिन ढवळे यांनी चांगली तयारी केली. पदवीधर मतदार नोंदणी करून घेतली. मराठवाड्यात जिल्हा लेव्हलला मोफत स्पर्धा परीक्षांची शिबिरे घेतली. पुण्यात आडलेल्या, नडलेल्या विद्यार्थ्यांना मदत केली. लॉक डाऊन मध्ये पुण्यात अडकलेल्या पोरांची जेवणाची सोय केली. महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन उभारणारे सचिन ढवळे हे पाहिलं नाव. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरांना, अपंग विद्यार्थ्यांना मोफत क्लास मध्ये शिकवलं. ही ढवळे मास्तरची सामाजिक कार्याची पार्श्वभूमी. प्रहार महाविकास आघाडीत सहभागी असूनही सचिन ढवळे यांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहून, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपला उमेदवार ढवळे यांच्या रूपाने मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उतरवला. मराठवाड्याच्या गावागावात सचिन ढवळे सरांचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांची कुठलीही अडचण सोडवू शकणारा मास्तर, विद्यार्थ्यांना मदत करणारा, विद्यार्थ्यांसाठी लढणारा मास्तर अशी सचिन ढवळे यांची ओळख आहे. त्याच्याच जीवावर त्यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघात प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे…
नितेश कराळे…
स्पर्धा परीक्षेचा पुणेरी पॅटर्न असं म्हणत वऱ्हाडी भाषेत खद खद करून कराळे सरांनी सोशल मीडिया मध्ये तुफान धुमाकूळ घातला. कोरोनाकाळत मनोरंजन म्हणून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियातून फिरू लागले. आणि पाहता पाहता स्पर्धा परीक्षेच्या पोरांना आपल्या भाषेत समजून सांगणारा मास्तर सापडला. सोशल मीडियाने मास्तर घराघरात पोहचवला. मास्तर इतके प्रसिद्ध झाले की, अनेक चॅनलनी कराळे मास्तरच्या मुलाखती घेतल्या, रोज मास्तर एका फेसबुक पेजवर लाईव्ह येऊ लागले. प्रसिद्धीचा झोत चढता होता. व्याख्यानासाठी सरांना निमंत्रणे येऊ लागली. आणि बघता बघता मास्तर स्पर्धा परीक्षेच्या बाहेरील लोकांनाही माहित झाले. कराळे गुरुजी नेमका विषय कोणता शिकवतात ? याचं उत्तर म्हणजे कराळे सर स्पर्धा परीक्षेतील कोणताही विषय तितक्याच ताकतीने शिकवतात असं आहे. वर्ध्यात फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी नावाचा त्यांचा क्लास आहे. तसचं कराळे सर चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखकही आहेत. कराळे मास्तरणे लॉकडाऊन काळात चार महिने स्पर्धा परीक्षेच्या पोरांना यूट्यूब व्हिडिओ करून फुकटात शिकवलं. कराळे मास्तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांकडून आणि शहीद सैनिकांच्या मुलांकडून एक रुपया सुद्धा फिस घेत नाहीत. तसेच स्वतःचा गावातील मुलांकडून सुद्धा ते फीस घेत नाहीत. ही कराळे मास्तरची सामाजिक कार्याची पार्श्वभूमी. कराळे गुरुजींनी क्लासमधील पोरांना हाताला धरून वर्ध्यात झाडं लावली. स्वच्छ्ता केली. प्रत्येक सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला. असं सगळं असताना सोशल मीडियाचा योग्य वापर करत कराळे सरांनी नागपूर मध्ये अन्य पक्षाच्या उमेदवारांना घाम फोडला आहे…
ही दोन्ही मास्तरं निवडून येतील किंवा नाही. याबद्दल हे विश्लेषण नव्हतंच. पण जेंव्हा निकाल लागतील तेव्हां मात्र या दोन्ही मास्तरांना केंद्रबिंदू मानून राजकीय विश्लेषकांना विश्लेषण करावं लागेल हे नक्की !
- रोहित गिरी औरंगाबाद ✍️
- 9604312182