नागेश सू. शेवाळकर, पुणे
नासा ! ही दोन अक्षरे मिळून तयार झालेला शब्द उच्चारला की, जगभरातील सर्वांच्या डोळ्यासमोर येते ती एक आंतरराष्ट्रीय संस्था ! अंतरिक्षाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणारी एक संस्था !
नासा हा शब्द उच्चारला की, महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रयोग करणारी, शिक्षकांना प्रशिक्षित करणारी सोबतच अनेकानेक सामाजिक चळवळीत सहभागी असणारी एक व्यक्ती डोळ्यासमोर येते. सोबतच या व्यक्तिचे साहित्य क्षेत्रातील बहुमोल आणि सातत्यपूर्ण लेखनही पटकन नजरेसमोर तरळते. नासा हे टोपण नाव असले तरी त्यांच्या नावाचे आणि वडिलांच्या नावाचे आद्याक्षर मिळून हे नाव तयार झाले आणि पाहता पाहता सर्वदूर पोहोचले. नागोराव हे त्यांचे नाव आणि सायन्ना हे वडिलांचे नाव या दोहोंचा संगम होऊन नासा येवतीकर हे नाव सर्वतोमुखी झाले.
मराठवाड्यातील जिल्हा नांदेड, तालुका धर्माबाद, गाव येवती ! महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांना जोडणारे हे गाव ! मातृभाषा तेलगू परंतु मराठी भाषेवर नागोराव यांचे जीवापाड प्रेम ! सायन्ना येवतीकर यांच्या घरात २६ एप्रिल १९७६ यादिवशी जन्मलेल्या बालकाचे नाव नागोराव ! वडील सायन्ना हे पेशाने शिक्षक ! साहित्यिक म्हणून कुणाचाही वारसा न लाभलेले नासा साहित्य क्षेत्राकडे आकर्षित झाले. नुसतेच आकर्षित झाले नाहीत तर या क्षेत्रात त्यांनी भरीव, नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक वृत्तपत्रातून त्यांचे शैक्षणिक व सामाजिक लेखन सातत्याने प्रकाशित होत असते. त्यांचे लेखन हे सामाजिक प्रबोधनचा वारसा चालवते. त्यांच्या लेखनीला विषयाचे वावडे नाही. विविध विषयावर लेखन करण्यात नासांचा हातखंडा आहे. त्यांची आजपर्यंत 10 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
डिजिटल अर्थात ऑनलाईन साहित्य ही आता काळाची गरज झाली आहे. हळूहळू का होईना लेखक आणि वाचक या साहित्य प्रकाराकडे वळले आहेत. लाखो लोक भ्रमणध्वनी, संगणक इत्यादी माध्यमातून आपली वाचनाची तृष्णा भागवताना दिसत आहेत. वाचकांची आवड लक्षात घेता शेकडो लेखकांनीही ह्या माध्यमाला पसंती दिली आहे. काळानुरुप होणारे बदल स्वीकारणे ही काळाची गरज असते. जो असे बदल घडवून आणतो त्याच्याकडे यशस्वीता धावत येते. नासा यांनी या ऑनलाईन माध्यमांचा पुरेपूर उपयोग करुन घेतला आहे हे त्यांनी ज्या आघाडीच्या ऑनलाईन प्रकाशन संस्थांवर साहित्य प्रकाशित केले त्यावरून लक्षात येईल. आज वाचकाने कोणत्याही ऑनलाईन प्रकाशन संस्थेवरील लेखकाची यादी पाहिली की अनेक संस्थांवर ‘नासा’ हे नाव ठळकपणे दिसून येईल. हजारो नव्हे लाखो वाचक त्यांच्या साहित्याचे वाचक असल्याचे लक्षात येईल. मातृभारती, स्टोरी मिरर, प्रतिलिपी, शॉपीझेन सारख्या प्रसिद्ध ऑनलाईन अँपवर त्यांचे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. वाचकांची संख्या क्षणागणिक वाढत जाते.
नासा यांचा अजून एक गुणविशेष म्हणजे ते स्वतःपुरते पाहत नाहीत तर अनेक लेखकांना व्यासपीठ मिळावे म्हणून ते नेहमी प्रयत्नशील असतात. ‘साहित्य सेवक’ हा त्यांनी स्थापन केलेला व्हाट्सएप समूह ! साहित्याचे सेवक या नावातच सारे काही सामावलेले आहे. नासा यांच्या कल्पक नेतृत्वातून आणि सुयोग्य नियोजनात्मक अंमलबजावणीतून समूहावर अनेक साहित्य कार्यक्रमाची मेजवानी असते. त्यामुळे या समूहात राज्यभरातील अनेक लेखक जोडले गेले आहेत. कविता, कथा, पुस्तक प्रकाशन अशा विविधांगी कार्यक्रमामुळे हा समूह लेखकप्रिय झाला आहे. अनेक लेखकांच्या ऑनलाईन पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम नासांनी या कोरोनामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत घडवून आणले आहेत. कोरोनामुळे लेखक- वाचक यांच्या जीवनात आलेली मरगळ अशा कार्यक्रमांमुळे काही अंशी दूर करण्यात नासा कमालीचे यशस्वी झाले आहेत.
साहित्याच्या क्षेत्रासोबत शैक्षणिक क्षेत्रात देखील ते कमालीचे लोकप्रिय आहेत. विविध उपक्रमाद्वारे प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मुलांच्या मनात जिज्ञासा निर्माण करतात. रोज एक कविता या उपक्रमाने महाराष्ट्रातील अनेक बालकवी-कवयित्रींच्या कविता शाळेतील फलकांवर लिहून शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात कवितेविषयी उत्सुकता निर्माण केले आहे. स्वतः कवी मनाचे असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कवीची प्रतिभा पाहण्याचा प्रयत्न केला आहे. शैक्षणिक लेखाद्वारे शिक्षकांना व पालकांना मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे.
आज नागोराव सायन्ना येवतीकर यांच्या वयाला पंचेचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. साहित्य क्षेत्राचा विचार करता हे वय तसे तरुण ! त्यामुळे नासा यांना साहित्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात खूप काही करता येण्यासारखे आहे. त्यांची तळमळ, निष्ठा, अभ्यास, आत्मविश्वास, कल्पकता पाहता ते या क्षेत्रात प्रचंड योगदान देतील यात तिळमात्र शंका नाही. स्वतःसोबत इतरांना पुढे नेणे हा त्यांचा गुण अधोरेखित करताना त्यांनी भरघोस यश मिळवावे, त्यांना निरोगी आयुष्य लाभावे ही ईशचरणी प्रार्थना ! ना. सा. येवतीकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!