आई अरण्यप्रेमी आणि वडील लेखक असल्यामुळे घरातूनच निसर्गाच्या अभ्यासातला पहिला गुरू भेटला. अरण्यविश्वात मारुती चितमपल्ली हे नाव आज अजरामर झाले आहे. पाच लाख किलोमीटर लांबीचा जंगलातला प्रवासच नव्हे तर अभ्यास त्यांनी पायपीट करून केला आहे. पारंपारिक शिक्षण झाल्यानंतर वानिकी महाविद्यालयाची वाट धरलेल्या विद्यार्थ्याने ३६ वर्षे वन विभागात नोकरी केली आणि आयुष्यातील जवळपास ६५ वर्षे जंगलाच्या घटकांचा अभ्यास करण्यात खर्ची घातली आणि आज ही ते काम जोमाने चालूच आहे. पक्षी, वनस्पती आणि निसर्गातील विविध घटकांचा बारकाईने निरीक्षण करून अभ्यास केला. जंगलातील अभ्यास करत असताना अनेक अनुभव त्यांना आले त्याचा उहापोह त्यांनी चकवाचांदण या आत्मकथनात केलाय. चकवाचांदण नाव देण्यामागचा त्यांचा उद्देशच खूप काही सांगून जातो. असचं जंगलात फेरफटका मारत असताना त्यांना एक मनामोराची शिकार करणारा शिकारी भेटला तेव्हा त्याला डॉ.सलीम अली यांच्या पुस्तकातील घुबडाचे चित्र दाखवले तेव्हा तो चकवाचांदण म्हणून उत्तराला. चितमपल्ली यांना नवल वाटलं घुबडासारख्या विचित्र पक्ष्याला एवढं चांगलं नाव असेल याचं. न राहून त्यांनी परत दुसरा प्रश्न केला तुम्ही त्याला असे का म्हणता? त्यावर तो साब, ते पखेरू कलमुहा हाय. रानात रात्रीच्या वेळी तो बोंबलू लागला की वाटेत आम्हांला चकवा मारतो. आमची रानभूल होते. अशा वेळी आम्ही जिथल्या तिथं बसून राहतो. आभाळात शुक्राची चांदणी दिसू लागते तेव्हा चकवा निघून जातो. आम्हाला वाट सापडते. म्हणून त्याला चकवाचांदण म्हणतो. हा खुलासा चितमपल्ली यांना भावला आणि त्यांनी आपल्या आत्मकथनाचे नाव चकवाचांदण ठेवलं.
नागपूर ते सोलापूर प्रवास करत असताना चितमपल्ली यांनी महाराष्ट्रातील एकही आदिवासी पाडा नसेल, जिथं ते गेले नाहीत. त्यांनी प्रत्येक आदिवासी पाड्यात भेटी दिल्या तिथली भोळी माणसं आणि त्यांची संस्कृती यांचा अभ्यास केला. प्रत्येक गोष्टीला या समाजामध्ये संज्ञा आहेत. असं त्यांचे ठाम मत आहे. आपल्याकडे गुलाबाच्या फुलाच्या वासाला गुलाबाचा वास किंवा मोगऱ्याला मोगऱ्याचा वास म्हणतो पण इथं अश्या प्रत्येक गोष्टीला नाव आहेत उदाहरणार्थ वाघाच्या वासाला ते बोतरन – बोतरन म्हणतात तर ज्या ठिकाणी अस्वल बसतो त्याला विरंगता विरंगता म्हणतात. तर मोहा फुलला की मोह्यान मोह्यान म्हटले जाते. ही आश्यर्यकारक बाब आहे. आपल्यासाठी हे नवीन आहे.
ज्या प्रमाणे सावरकांनी मराठी साहित्याला अनेक शब्दाची उत्पत्ती करून दिली. त्याच प्रमाणे चितमपल्ली यांनी देखील अशा अनेक निसर्ग विषयक शब्दांची भर मराठी साहित्यात घातलेली दिसून येते. त्यांनी कावळ्याच्या वसाहतीला काकागार असे नाव दिले ज्याला इंग्लिश मध्ये रूकरी म्हटले जाते. असे कित्येक नवनवीन शब्द त्यांनी सोधून काढलेत आणि वयाच्या ९० व्या वर्षी सुद्धा ते थकले नाहीत. सध्या त्यांनी पक्षिकोश लिहायला घेतला आहे ज्या कोशात २७ खंड आहेत अन् एका खंडात सुमारे २००० पाने आहेत. हा खंड मराठी साहित्य क्षेत्राला एक वेगळी दिशा देईल. असं जाणकारांचे मत आहे. पाड्यात भटकंती करून निसर्गातील विविध घटकांची नावे जाणून घेऊन त्याला ओघवत्या शैलीत शब्दबध्द करण्याच्या त्यांचा प्रयत्न कायमच चालू असतो.
अशा विविध घटकांची माहिती मिळवत असताना कोल्हापुरात एके दिवशी एका पारध्याने त्यांना खास रात्री एक वाजता वस्तीत यायला सांगितले. नवीन काहीतरी जाणून घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी ती जोखीम स्वीकारली आणि ठरल्या प्रमाणे रात्री एक वाजता ते वस्तीत गेले. सगळीकडे काळोख पसरला होता .त्या पारध्याने एक टोपली डोक्यावर घेतली आणि अंधारात चाचपडत शेताच्या दिशेने त्यांना घेऊन निघाला. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याने ती टोपली सोडली आणि त्याच्यातून शेकडो उंदीर बाहेर पडले.अर्ध्या तासाच्या अंतराने चमत्कार झाला गेलेले सगळे उंदीर परत माघारी आले. आणि नुसते आले नाहीत तर येताना प्रत्येकाने त्याच्या तोंडात ज्वारीचे एक-एक कणीस आणलं होतं.पारध्याने ती कणसे गोळा केली आणि परत सगळे उंदीर त्या टोपल्यात भरले आणि परतीची वाट चालू लागला हे बघून चितमपल्ली यांना नवल वाटलं. असं कसं शक्य आहे. म्हणजे या भूतलावर माणूस उंदीर सुद्धा पाळू शकतोय! अशा अनेक ज्या आपण विचार ही करू शकत नाही अशा गोष्टी मारुती चितमपल्ली यांनी अनुभवल्या. आणि त्या ओघावत्या शब्दात रेखाटल्या सुद्धा…
अशा या महान अरण्यऋषीचा येणारा वाढदिवस आणि पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंती निमित्ताने राज्य शासनाच्या वतीने भारतातील पहिलाच ‘पक्षी सप्ताह’ साजरा होतोय. त्याच्या निमित्ताने लिहिण्याचा अट्टाहास…
गणेश अरुण मोरे
मोहोळ जि.सोलापूर