संगिता हाळे यांचे ढवटाकळी येथील प्रतिपादन
देगलूर (सिकंदर शेख) :
भारतीय संस्कृती महान म्हणून जगभरात प्रसिध्द आहे. आपल्या संस्कृतीला जगभरात अनन्यसाधारण महत्व असून ती कायम जोपासण्याचे कार्य तरुणांनी केले पाहिजे, आपली भूमी हे संत- महात्म्यांची पावन भूमी आहे.
यामुळे आपली संस्कृती आपण जपलीच पाहीजे याची जाणिव पालकांनी आपल्या मुला बाळांना जन्मापासूनच संस्काराच्या माध्यमातून दिले पाहिजे, तसेच संस्कार मिळवण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे सप्ताह, सत्संग, भजन, महामानवाचे विचार हे असून या संस्कार मिळवण्याच्या माध्यमाचे जास्तीत जास्त आयोजन करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन शि.भ.प.तथा सुप्रसिध्द किर्तनकार सौ. संगिता शिवकुमार हाळे केले. ढवटाकळी (मंडळ मदनूर, तेलंगणा) येथे आयोजित अखंड शिवनाम सप्ताहमध्ये चौथ्या दिवशी किर्तनरुपी सेवा देताना त्या बोलत होत्या.
समाजप्रबोधन करण्यासाठी अनेक सतांनी सप्ताहाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करत आपले संपुर्ण आयुष्य झिजवले, खरेतर या प्रबोधनातून बोध घेण्याचे कार्य आपले आहे. येणाऱ्या काळात अशा सप्ताहातून मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर समाजहितासाठी कसा करता येईल यावरही विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास शिवकथाकार शि. भ. प. बडुरे महाराज, सुप्रसिध्दक गायक गंगाधर मलकापूरकर, बस्वराज मंडगीकर, राम महाराज झुबरे, विलास सगरोळीकर, गणेश थोटे वांजरवाडेकर यांच्यासह सुप्रसिध्दक मृदंगवादक संतोष शेटकार व लक्ष्मन चिंचोलीकर यांचे सुश्राव्य वादन व गायनही यावेळी झाले. या किर्तन श्रवणासाठी परिसरातील भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.