माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना लांजात तत्काळ आरोग्य सुविधांसह कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेन सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. अन्यथा रुग्णांसाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरण्याची तयारी त्यांनी दर्शवली असून हा जिल्हा प्रशासनासाठी इशारा आहे.
जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयात रुग्ण संख्या अधिक झाल्यामुळे रुग्णांसाठी पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. कोविड केअर सेंटर देखील अपुरे आहेत.
आरोग्य विभागाला आणि तालुका स्तरावर निर्देश देण्यात यावेत अशी सूचना निलेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली असून रुग्णांचे सातत्याने हाल होत राहिले तर मात्र आक्रमक होऊन रुग्णांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावरही उतरू असा इशारा देखील निलेश राणे यांनी दिला आहे.
लांजा तालुक्यात तर आरोग्य सुविधेअभावी कोविड रुग्णांचे खूप हाल असून कोणतीच शासकीय यंत्रणा रुग्णांसाठी सुविधा देताना दिसत नाही. याबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर निलेश राणे यांनी हा इशारा दिला आहे.