मुंबई : स्वतंत्र ओबीसी व VJNT विद्यार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली मुंबई शहर आणि उपनगरातील चार वसतिगृहे अद्यापही सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांपासून चाललेल्या मागण्या आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतरही शासन निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विद्यार्थी एकता मंच यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाने २८ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वतंत्र वसतिगृहांसाठी शासन निर्णय काढला होता. शहर आणि उपनगरात प्रत्येकी १०० मुलांचे व १०० मुलींचे असे एकूण चार वसतिगृहे सुरू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र ही वसतिगृहे आजवर प्रत्यक्षात सुरू न झाल्यामुळे ती केवळ कागदोपत्रीत मर्यादित असल्याचे मंचने म्हटले आहे.
यापूर्वी समाज कल्याण विभागाच्या २१ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार दरवर्षी ५०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची तरतूद होती. तथापि, हा नियम सलग सहा वर्षे लागू न राहिल्यामुळे सुमारे ३,००० विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळण्यापासून वंचित राहावे लागले. तसेच २८ फेब्रुवारी २०२३ च्या निर्णयानुसार अपेक्षित १,२०० विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप मंचने केला आहे.
“मुंबईतील अनेक ओबीसी व VJNT विद्यार्थ्यांकडे सुरक्षित निवासाची सुविधा नाही. निवासाच्या अडचणीमुळे त्यांचे शिक्षण धोक्यात येत आहे. शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असून आता शांततापूर्ण पण ठाम आंदोलनाशिवाय पर्याय नाही,” असे इतर मागास बहुजन कल्याण विद्यार्थी एकता मंच यांनी सांगितले.
ओबीसी विभागाचा निधीविषयक प्रश्न पुढे करून वित्त विभागावर दोषारोप केला जात असला, तरी त्याचा परिणाम गरीब, ग्रामीण व बहुजन पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांवर होत असल्याचे मंचचे म्हणणे आहे. मुंबईत किमान २,००० मुलांचे आणि २,००० मुलींच्या वसतिगृहांची तातडीची आवश्यकता असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
मंच लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर करणार असून मंत्रालयाच्या गार्डन गेटवर शांततेत पण निर्धाराने आंदोलन केले जाणार आहे.
संपर्क :
📞 मो.: ९७६९०५५५६६
📧 ईमेल : embkvam@gmail.com
✍️ हर्षल खैरनार
इतर मागास बहुजन कल्याण विद्यार्थी एकता मंच

