शर्जील ऊस्मानी प्रकरणावरुन भाजपा पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. “कुणी बाहेरुन येतो आणि धर्माबद्दल गैर बोलून परतसुद्धा जातो याचाच अर्थ शर्जीलला पळून जाण्यात महाविकासआघाडी सरकारने मदत केलीय” असा गंभीर आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर चांगलेच टीकास्त्र सोडले.
राज्य सरकारकडून अटक केली जाईल असे म्हटले जात आहे. मात्र अटक कधी होणार आहे? आम्ही मागणी केल्यानंतरच का? असा सवालसुद्धा त्यांनी यावेळी ऊपस्थित केला. “परिषदेला वादग्रस्त पार्श्वभूमि आहे. अशांत मुळात परिषदेला परवानगीच का देण्यात आली. त्यानंतरसुद्धा शर्जील हिंदू धर्माबद्दल गैर बोलला तरिसुद्धा त्याला परत जाऊ दिले म्हणजे महाविकाआघाडीचे यास पाठबळ आहे हे दिसतेच आहे असे गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकारवर केले.”
यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेनेवर चांगलीच टीका केली. “खाली डोकं, वर पाय” अशी शिवसेनेची अवस्था झाल्याचे ते म्हणाले. “हिंदुत्व भाजपची मक्तेदारी नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, मुळ विचारांना तिलांजली देऊन अशी भाषा वापरणे ही कुठली भूमिका आहे. शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी” असेसुद्धा ते यावेळी म्हणाले.