‘विरारसारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य सरकारने खबरदारी घ्यावी’

8

कोरोनाच्या भयानक परिस्थितीचा सामना करत असताना नाशिक रुग्णालयातील ऑक्सीजन गळतीमुळे आणि विरारमधील आजची दुर्घटना घडली. कोरोना महामारीच्या या भीषण संकटात एक एक जीव वाचवण्याचा प्रयत्न होत असताना अशा घटनांमुळे जीव गमावावे लागणे हे अत्यंत वेदनादायी व क्लेशदायक आहे. राज्य सरकारने अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेऊन योग्य ती पावले उचलावीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरार येथील विजय वल्लभ हॉस्पीटलला भेट देऊन पाहणी केली व अधिका-यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केलेली आहे. तसेच या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेशही दिले आहेत. चौकशीतून सत्य बाहेर येईल आणि कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर सरकार कारवाई करेल.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री यांनी विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि मृत रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या.