कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आज राज्यभर उपोषण; ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा.

9

केंद्रातील मोदी सरकारने कोणाशीही चर्चा न करता संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर मंजूर करवून घेतलेले कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात शेतकरी संघटनांनी शुक्रवार २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा सक्रीय पाठिंबा असून या बंदमध्ये सहभागी होत काँग्रेस पक्ष राज्यभर उपोषण करणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह इतर नेत्यांसह व मंत्र्यांसह मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उपोषण करणार आहेत.

राज्यातील सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणीही काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या उपोषणात सहभागी होणार आहेत. प्रदेश कार्याध्यक्ष हे विभागाच्या मुख्यालयी उपोषणाला बसणार आहेत. औरंगाबाद येथे शिवाजीराव मोघे, ठाणे येथे माजी मंत्री नसीम खान, नागपूर येथे चंद्रकांत हांडोरे, पुणे यथे बस्वराज पाटील, नाशिकमध्ये आ. प्रणिती शिंदे तर अमरावतीत आ. कुणाल पाटील, हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार आहेत.