सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होणाऱ्या आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे-जे करणे शक्य आहे ते सर्व करणारच आणि हे वचन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयात आयोजित हुतात्मा दालन उद्घाटन व कॉफी टेबल बुक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, शौर्याला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. २६ नोव्हेंबर हा शौर्यदिन. या दिनी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना वंदन व नतमस्तक. हा दिवस आपण विसरू शकत नाही. बारा वर्ष झाली, यापुढेही कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरून येणार नाही.
नक्षलवादी अतिरेक्यांपासून ते भुरट्या चोरांपासून सर्वांना पकडणारा हा आमचा पोलीस महत्त्वाचा घटक आहे. तो सुदृढ राहिलाच पाहिजे, त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे अतिरेकी महाराष्ट्र, मुंबईवर हल्ला काय पण मुंबईचे नाव पण घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल असे आपण पोलीस दलाचे भक्कम सक्षमीकरण करू. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.