औरंगाबादेत पुन्हा ‘सुपर संभाजीनगर विरुद्ध नमस्ते संभाजीनगर’

35

मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भावनिक राजकारण खेळते असा आरोप विरोधकांनी केला होता. आता त्याच मुद्द्याला नविन वळण मिळताना पाहायला मिळत आहे.

नामांतराच्या मुद्द्यावरून आता भाजप आणि शिवसेनेमध्ये बॅनरवॉर सुरू झाले आहे. भाजप युवा मोर्चाने शिवसेनेचे नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात ‘नमस्ते संभाजीनगर’चे बॅनर लावले आहेत. शुक्रवारी रात्री भाजपा युवा मोर्चाने शहरात ‘लव्ह औरंगाबाद’ बोर्डाच्या समोर ‘नमस्ते संभाजीनगर’चे फ्लेक्स लावले. याआधी शिवसेनेच्या वतीने ‘सुपर संभाजीनगर’ बोर्ड लावण्यात आले.

भाजपने संभाजीनगर नामांतर करा अशी मागणी केली आहे. मात्र शिवसेना राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांसह सत्तेत आहे. आणि काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. त्यातच आता हे भाजपचे नमस्ते संभाजीनगरचे फलक शिवसेनेला आव्हान निर्माण करण्यासाठी लावण्यात आले आहेत.