महानायक अमिताभ बच्चन आणि अजय देवगण चक्क बारामती विमानतळावर

136

महानायक अमिताभ बच्चन शुक्रवारी दि. १२ला अभिनेता अजय देवगण यांच्यासह बारामतीला भेट दिली आहे. यावेळी बारामती येथील विमानतळावर बच्चन आणि देवगण यांच्या आगामी हिंदी चित्रपटाचे काही चित्रीकरण पार पडल्याची माहिती मिळत आहे. बिग बी आणि अजय देवगण आज सकाळी बारामती एअरपोर्टवर उतरल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बारामती विमानतळावर एका चित्रपटातील एका प्रसंगाचे चित्रिकरण होणार होते. या बाबतची पूर्वकल्पना काही मोजक्याच लोकांना होती. आज खाजगी विमानाने बच्चन व अजय देवगण अकराच्या सुमारास बारामती विमानतळावर उतरले. काही वेळानंतर एका हेलिकॉप्टरमध्ये बसून ते विमानतळावर उतरतात आणि उतरल्यानंतर अभिवादन करतात असा तो प्रसंग होता. कोणत्या चित्रपटातील हा प्रसंग होता, हे मात्र अजून महिती नाही.

शूट पूर्ण झाल्यावर दोघेही पुन्हा मुंबईला परतले. अमिताभ बच्चन व अजय देवगण यांचे स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार, शुभांगी पवार आदींनी केले. त्यांनी काही वेळ या दोघांशी संवादही साधला. अनेकांना ही बातमी समजल्यावर लोकांनी विमानतळाकडे धाव घेतली मात्र तो पर्यंत शुटींग आटोपून हे दोन्ही तारे मुंबईकडे विमानाने रवाना झाले होते.