केंद्र सरकारच्या विरोधात पेटून उठणार स्वाभिमानी शेतकरी संघटना

0

नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा आणण्यात आला. परंतु पोलिसांनी तो पुतळा ताब्यात घेतला. कार्यकर्त्यांनी त्या पुतळ्याचे अवशेष गोळा केले . आणि पेटवून दिले . त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटपट झाली. झटापट होत असताना पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या कॉलरला हात घातला.

या आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांबरोबर गृहमंत्र्यांवरही टीका केली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या प्रकारामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांचे धोरणाविरुद्ध घेत असलेल्या भूमिकेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक आणून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. हे विधेयक मागे घेण्यात यावे अशी मागणी ही त्यांनी केली.

शेतकऱ्यांना खलिस्थानवादी ठरवणारे अमित शहा कोण लागून गेले? येत्या दोन दिवसात दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय न झाल्यास संपूर्ण देश केंद्र सरकारच्या विरोधात पेटून उठेल . अशा शब्दात राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जात आणि प्रांतवाद देण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण देश केंद्राच्या विरोधात पेटवून सोडल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही. असही शेट्टी यावेळी म्हणाले. या झालेल्या प्रकारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर निषेध केला आहे.