‘कोरोना लसचा डोस घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा

13

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा डोस घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 130व्या जयंतीनिमित्त नागरिकांनी अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काल रविराज पार्क जयंती उत्सव समिती परभणीने आयोजित कार्यक्रमात केले.

परभणी येथील ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूलमध्ये प्रशासन आणि रविराज पार्क जयंती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी टाकसाळे बोलत होते.

याप्रसंगी पुढे बोलताना शिवानंद टाकसाळे यांनी संविधानाने आपणास विज्ञाननिष्ठ बनण्याची हाक दिली असून विज्ञानाचा अंगिकार करत आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबीर हे मानवतावादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांना सच्चे अभिवादन होय.

संविधान, विज्ञान आणि लसीकरणाचे रसायनातून आपण कोरोनाचा यशस्वी मुकाबला करू शकतो असे सांगून यंदाच्या जयंती महोत्सवात लसीकरणावर भर देऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे त्यांनी समाजाला आवाहन केले.