नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सैराटमधल्या लंगड्याने म्हणजेच तानाजी गालगुंडेने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. हाच लंगड्या आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गस्त’ या चित्रपटात तानाजी दिसणार आहे. झी टॉकीज प्रस्तुत ‘गस्त’ या चित्रपटात तानाजी प्रमुख भूमिका साकारणार आहे.
याबाबत तानाजी म्हणाला, मी गस्त या चित्रपटात अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय. तो एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ज्या गावात राहतोय त्या गावात पहारा देत असताना त्या मुलीला तो चोरून भेटत असतो. त्यांची प्रेमकथा पुढे काय वळण घेते हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी एका गावाकडच्या मुलाची भूमिका निभावतोय आणि प्रेक्षकांना देखील ती नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.
सैराट चित्रपटामध्ये तानाजीने लंगड्याची भूमिका जबरदस्त साकारलेली होती. आजही तानाजी सैराटच्या भूमिकेबद्दल ओळखला जातो. प्रेक्षकांचं त्याला खूप प्रेम मिळालं होतं. आता गस्त या आगामी चित्रपटात तानाजी आपल्या अभिनयाची छाप सोडणार आहे. प्रेक्षकांनाही त्याच्या या भूमिकेबद्दल उत्सुकता लागून राहिलेली आहे.