विशाल पट्टोपाध्याय
इस्रायल आणि इराण या दोन राष्ट्रांचे जागतिक पातळीवर काय संबंध आहेत हे अख्ख्या जगाला ठावूक आहे. ज्यूंचा देशच नाहीसा करून टाकायचा हे ध्येय इराण बाळगून आहे आणि त्यांना मदत करतायत अनेक दहशतवादी संघटना, म्हणून इराण सध्या जो न्युक्लिअर वेपन्स प्रोग्राम चालवत आहे त्यावर इस्रायला अधिक करडी नजर ठेवून आहे. हि आहे सध्याची सत्य पार्श्वभूमी आणि हीच पार्श्वभूमी डोळ्यापुढे ठेवून तयार झालेली सिरीज म्हणजे ‘तेहरान’!
तेहरान हि इराणची राजधानी आणि या राजधानीत शिरते इस्रायलची एक लेडी एजंट कम हॅकर – तमार, तिचं काम असतं इराणचा न्युक्लिअर रीएक्टर उध्वस्त करण्यासाठी इराणच्या वायुदलाची सिस्टम हॅक करायची, जेणेकरून इस्रायलचे वायुदल रडार वर नजरेस पडल्याशिवाय इराणमध्ये घुसून त्या न्युक्लिअर रीएक्टरला नष्ट करेल. प्लान अगदी फुलप्रुफ असतो, पण इराणचे सुरक्षा एजंट सुद्धा लेचेपेचे अजिबात नाहीत. इराण मध्ये इस्रायली नागरिकाला येण्याची परवानगी नाही आणि जर का कोणी तिथे सापडला तर अडकलाच समजा, म्हणून सिरीजच्या नावावर छोट्या अक्षरात टॅगलाईन आहे – Once you are in, There’s no way out आणि आपण सुद्धा एकदा सिरीज बघयला घेतली कि संपवल्याशिवाय बाहेर पडावेसे वाटत नाही.
सिरीज मध्ये सुरुवातीलाच मोठा ट्वीस्ट आहे, ज्यामुळे पोलिसांना खबर लागते कि इस्रायलने त्यांची एक एजंट आपल्या देशात पाठवली आहे. तिचा चेहरा सुद्धा उघड होतो आणि मग सुरु होतो नुसता थरार! तमार स्वत:ला सतत कसं लपवून ठेवते? इस्रायली सुरक्षा यंत्रणे कडून तिला तेहरान मधून बाहेर काढण्यासाठी काय काय शक्कल लढवली जाते? इस्रायलचा प्लान यशस्वी होतो कि इराण त्यांच्यावर भारी पडतो या सगळ्याची उत्तरे मिळवण्यासाठी हि सिरीज पहायला हवी. जर तुम्ही फौदा पाहिली असेल तर तेहरान त्यापेक्षा काहीशी कमी थ्रिलर आहे. पण ती या सिरीजची अजिबात पडती बाजू नाही कारण त्या कथेचा गाभा वेगळा आहे आणि या कथेचा पूर्ण वेगळा, त्यामुळे तेहरान सुद्धा फौदा प्रमाणेच बेस्ट इस्रायली स्पाय सिरीज मध्ये गणली जाईल. शेवटच्या भागात कथेने घेतलेले अनपेक्षित वळण दुसऱ्या सिझनची वाट पाहायला लावणारं आहे.
सिरीज अधिकृतपणे Apple TV+ वर उपलब्ध आहे आणि टोरंटवर सुद्धा आता सगळे भाग आलेले आहेत. शेवटचा भाग पाहताना कळलं कि याचे हिंदी सबटायटल्स सुद्धा आहेत. त्यामुळे भाषेचा अडसर असेल तर हे सबटायटल्स उपयोगी पडतील.