टेलिव्हिजन विश्वासाठी आणखी एक दुःखाची बातमी समोर येत आहे. ‘ससूराल सिमर का’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत झळकलेल्या अभिनेता आशिष रॉय यांचे आज दुःखद निधन झाले आहे. आशिष 55 वर्षाचे असून अविवाहित होते. खूप दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराचा सामना करत होते. कीडनी फेल झाल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पैसे नसल्यामुळे त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट करण्यास नकार दिला होता.
गोरेगाव येथील रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले होते. परंतु उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यांनी सोशल मिडियावर मदतीसाठीचे आव्हान केले होते. त्यांना रुग्णालयाचे बिल भरणे ही कठीण झाले होते त्यामुळे ते पूर्ण उपचार न घेता घरी परतले होते. जोगेश्वरी येथील राहत्या घरात त्यांचा मृत्यु झाला आहे.
एका मुलाखतीत आशिष रॉय म्हंटले होते, त्यांच्याकडे उपचारासाठी पुरेशे पैसे नाहीत. त्यांना पैशाची गरज आहे अन्यथा डॉक्टर उपचार बंद करतील. आशिषना एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने मदत केली होती. त्यांच्या स्पॉटबॉयच्या म्हणण्यानुसार त्यांनी सलमान खान यांच्याकडून मदत मागितली होती परंतु त्यांना तिथूनही मदत मिळाली नाही. अभिनेता अनुप सोनी आणि फिल्ममेकर हंसल मेहता यांनी त्यांना मदत करत इतरांनाही मदत करण्याचं आव्हान केलं होतं. आशिष यांची बहीण कोलकताहून मुंबईसाठी रवाना झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.