राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यानिमित्त काल नागपूर जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील पक्ष संघटनेचा आढावा घेणारी बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, “नेत्यांची खरी ताकद कार्यकर्ते असतात. आपल्या नेत्यांच्या मागे कार्यकर्ते नेहमीच उभे राहतात. आज सभागृहात मोठी गर्दी होती, गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे सक्षमपणे उभे राहतात हे पाहून समाधान वाटले.
आगामी काळात नागपूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मागच्या वेळेस पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. अनेक जण पक्ष सोडून गेले. मात्र या गोष्टी मागे टाका. ‘वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है’ पक्षाचे बुथ संघटन अधिक मजबूत करा, जोमाने कामाला लागा, राष्ट्रवादी परिवाराचा विस्तार करा आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांचा प्रसार करा.” असे जयंत पाटील म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, “नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन अत्यंत मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण चांगलं काम करत आहोत. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठत आहे. आपण विरोधकांकडे दुर्लक्ष करून आपले काम करावे.” असे आवाहन देशमुख यांनी केले.
यावेळी माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिनानाथ पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.