परभणी जिल्ह्यातील सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानतर्फे सर्व सोयी सुविधांनीयुक्त दोनशे खाटांंचे श्री शरदचंद्रजी पवार कोव्हिड केअर सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी दिली.
करोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मोठ्या शहरांमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. उपचारातील विलंबामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता वाढत आहे. सेलू परिसरातही करोना संक्रमणाची दुसरी लाट फार भयंकर वेगाने फोफावत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीतून प्रतिष्ठानच्या विद्याविहार शैक्षणिक संकुल इमारतीत कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात येईल.
दोनशे बेड पैकी दहा बेडवर व्हेंटिलेटरची सुविधा आहे. यासाठी ऑक्सीजन सिलिंडर व दहा विशेष बेडही मागविण्यात आले आहेत. अन्य १९० बेडची व्यवस्था झाली आहे. इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्ण सेवेत राहणार असून येत्या तीन दिवसांत हे सेंटर सुरू होईल, असे डॉ.रोडगे यांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी दुपारी तहसीलदार बालाजी शेवाळे, नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांनी या सेंटरची व व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी डॉ.संजय रोडगे उपस्थित होते.