आजचा दिवस हा हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी ‘काळा दिवस’ आहे, असे सांगत युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन आणि पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन या हॉटेल व्यवसायिकांच्या संघटनेने निर्बंधांना विरोध करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना आज भाडे भरण्याची देखील अडचण असून, व्यवसाय करायचा कसा हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. अशी परिस्थिती असताना आजच्या बैठकीत लागलेल्या निर्बंधांमुळे हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिक हवालदिल झाले आहेत.
सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करण्यास तयार असून, आम्हालाही व्यवसाय करायची संधी द्यावी, अशी मागणी असोसिएशनचे सचिव दर्शन रावल यांनी केली.