राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी तब्बल ‘इतके’ मतदान

8

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. मदान यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत.

सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे.

आज मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी मतदारांच्या रांगा होत्या. गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांत मात्र दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ होती, असेही श्री. मदान यांनी सांगितले.