रंगविक्रेत्यांच्या व्यवसायावर लॉकडाऊनची कुऱ्हाड; विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरचे उडाले रंग

13

जागतिक कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदीने यावर्षीच्या होळीसह रंगपंचमीच्या सणासुदीवर पूर्णतः गंडांतर आले आहे. त्यामुळे युवक, बालकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

गेल्यावर्षीसुध्दा होळी व रंगपंचमीवर कोरोनाचे सावट होते. यावर्षीसुध्दा होळी व रंगपंचमी हे दोन्हीही सण कोरोना लॉकडाऊनच्या टप्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, तरुणांसह बच्चे कंपनींना यावर्षी सार्वजनिक स्थळी होळी पेटवता आली नाही. तसेच रंगपंचमीनिमित्त चौकांसह रस्त्या-रस्त्यांवर रंग खेळता येणार नाही, हे स्पष्ट आहे.

लॉकडाऊन मूळे यावर्षी रंग विक्रेत्यांच्या व्यवसायावर संकट कोसळले आहे. रंगविक्रेते मोठ्याप्रमाणावर पिचकार्‍यांसह रंग विक्री करतात. परंतु यावर्षी संचारबंदीने या विक्रेत्यांना रंग आणि पिचकारी विकण्यास जमलेल नाही. त्यामुळे विक्रेत्यांवर आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ आली आहे. यंदा बाजारात रंग आणि पिचकाऱ्या विक्रीस अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अनेक विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.