मुंबई पोलिसांनी विक्रोळी परिसरात 12 फेब्रुवारी रोजी ही कारवाई केली असून पकडलेल्या या गांजीची किंमत तब्बल 3 कोटी रुपये आहे. विक्रोळी-ठाणे मार्गावर एका टेम्पोतून वाहतूक करण्यात येत असलेला १ हजार ८०० किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईची अधिकृत माहिती सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. पोलिसांच्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने ही कारवाई केली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यानंतर पोलिसांनी येथे सापळा रचत तब्बल 1800 किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत बाजारमूल्यानुसार 3 कोटी रुपये आहे. पोलिसांनी आपल्या कारवाई दरम्यान दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे.
त्यांची नांव अनुक्रमे यादव आणि सोनवणे असे आहे. प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार हे आरोपी ओडिसामधून गांजा आणायचे. ओडिसा येथून गांजा आणल्यानंतर ते भिवंडी येथील गोदामात हा गांजा ठेवायचे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप सातपुते हा फरार आहे.
अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी ब्युरोने मुंबईत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या आहेत. अनेक चित्रपट कलावंत व त्यांना अंमली पदार्थ पुरविणार्यांची धरपकड केली. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानेही अनेक कारवाया केल्या आहेत. असे असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजाची वाहतूक केली जात होती.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करी संबंधात एकूण 32 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पकडण्यात आलेल्या गांजाची किंमत तब्बल पंधरा कोटी आहे. ड्रग्ज तस्करीचे हे रॅकेट समोर आल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे