पत्रकार आणि विरोधकांवर सरकारकडून दाखल करण्यात येत असलेल्या गुन्ह्यांवर प्रियांका गांधी यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, ‘अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणे आणि पत्रकार आणि विरोधकांना धमकावण्याचा प्रकार हा अत्यंत भयानक आहे.
केंद्रातील भाजप सरकार देशातील शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणीही त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
प्रियांका गांधींनी ट्वीटमध्ये केले की, ‘शेतकरी आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांवर आता देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. अनेक ठिकाणचे इंटरनेट बंद करण्यात येत आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजप सरकारकडून विरोधकांना आणि पत्रकारांना धमकावण्यासाठी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणे म्हणजे लोकशाहीच्या सर्व मर्यादा पार करण्यासारखं असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकशाहीचा सन्मान करणे हे काही सरकारच्या मर्जीवर अवलंबून नसून सरकारची ती जबाबदारी आहे. अशा प्रकारचे भितीचे वातावरण हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.