राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह संवाद साधला. विधानसभा निवडणुकीआधी याच ठिकाणी सभा झाली होती. त्यावेळी आम्ही महाराष्ट्रभर शिवस्वराज्य यात्रा काढली होती. लोकांनी त्यावेळी मोठ्या उत्साहात स्वागत केलं होतं. त्याचप्रमाणे निवडणुकीमध्ये इथल्या लोकांनी भरभरून प्रेम करत अनिलबाबूंना निवडून दिले त्याबद्दल जयंत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आदरणीय शरद पवार साहेबांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार राज्यात आलं. आपल्या काटोलमधील नेत्याला पवार साहेबांनी महत्त्वपूर्ण खाते देऊन गृहमंत्री केले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत, मालाला आधारभूत किंमत मिळावी ही त्यांची मागणी आहे, पण केंद्र सरकारला वेळ असला तरी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची इच्छा नाही, अशी टीका त्यांनी केली. दोन महिने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारीला गोंधळ का घालतील, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारचा पाठिंबा आहे. राज्यात अतिवृष्टी झाली तेव्हा तिजोरीत खडखडाट असतानाही सरकारने शेतकऱ्याला मदत केली आहे, आणि कोणत्याही संकटकाळात सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील, असा दिलासा त्यांनी दिला. तसेच आपल्या सरकारच्या काळात जास्तीत जास्त लोकांच्या समस्यांची सोडवणूक करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवार वाढवा, असे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.