लोकसभेच्या आज झालेल्या अधिवेशनात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मागण्या व लेखानुदानावर पार पडलेल्या चर्चेदरम्यान खासदार कोल्हे यांनी आरोग्य क्षेत्रातील आपली हुकूमत दाखवून देत विविध मुद्द्यांना स्पर्श करत अभ्यासपूर्ण मांडणी केली.
१८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यापासून, आय.ए.एस., आय.पी.एस. प्रमाणेच आय.एच.एस. सुरू करण्याची मागणी कोल्हे यांनी आज सभागृहात प्रभावीपणे मांडत प्रत्येक विषयात धोरणात्मक बदलाची गरज असल्याचे सांगितले.
प्रत्येक अपघातामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो ‘ट्रिटमेंट इन गोल्डन अवर’ त्यामुळे प्रत्येक महामार्गावर दर ५० किलोमीटर अंतरावर ट्रॉमा केयर सेंटरची उभारणी केली तर अनेक लोकांचा जीव वाचू शकेल, असेही खासदार डॉ. कोल्हे यांनी नमुद केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप आणि सीएसआरच्या माध्यमातून इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्प राबविला जाणार आहे. यामध्ये ९ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि डायग्नॉस्टिक सेंटरचा समावेश असणार आहे. याकरीता केंद्र सरकारने विशेष निधी द्यावा, अशी जोरदार मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे आज सभागृहात केली.
ज्या आशा वर्कर्सने स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा दिली. त्यांना केवळ २ हजार रुपयांचे मासिक मानधन पुरेसे नाही. त्यामुळे आशा वर्कर्स यांचे योगदान, जबाबदारी आणि जोखीम यांचा विचार करून किमान वेतनानुसार एक सन्मानजनक मानधन द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.