आ. रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली जाण्याने, अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला शोक

17

देगलूरचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे अकाली निधन धक्कादायक असून, त्यांच्या रूपात मी खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी गमावला असल्याची भावना मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

मागील काही दिवसांपासून आमदार रावसाहेब अंतापूरकर त्यांचे आजारपण वाढतच होते. परंतु, अंतापूरकरांचे व्यक्तीमत्व संघर्षशील होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला होता व अनेकदा खडतर परिस्थितींवर मात केली होती. कोरोनातूनही ते बरे झाले होते. त्यामुळे या आजारपणातून ते बाहेर पडतील, अशी आशा होती. परंतु, दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घालून सर्वसामान्यांमधील एक लोकप्रिय नेतृत्व हिरावून घेतले. असा शोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

आ. रावसाहेब अंतापूरकर एक मनमिळाऊ, संवेदनशील लोकप्रतिनिधी होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. राजकारणात नवखे असताना देखील पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. आमदार असताना व नसतानाही त्यांनी प्रामाणिकपणे लोकांची कामे केली. त्यामुळेच जनतेने त्यांना दुसऱ्यांदा आमदार केले.

चव्हाण कुटुंबाशी त्यांचे संबंध राजकारणापलिकडचे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने मी समाजकारणातील सहकारीच नव्हे तर एक कौटुंबिक स्नेही गमावला आहे. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली चव्हाण यांनी वाहिली आहे.