शरद पवारांच्या निकटवर्तीय आमदाराची प्रकृती चिंताजनक, पवारांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट

14

पंढरपूरचे राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार भरत भालके यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार म्हणून भारत भालके सगळ्यांना परिचित आहेत. भरत भालके यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन भरत भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच त्यांना पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर पाच दिवसांनी 4 नोव्हेंबर रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण काही दिवसांनी पुन्हा त्रास जाणवू लागल्याने मागील आठवड्यात पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. परंतु, गुरुवारपासून त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यांना किडनीचा आजार आणि मधुमेहाचा त्रास आहे.

आमदार भारत भालके यांची प्रकती अतिशय नाजूक आहे, पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली असल्याची माहिती रुबी हॉस्पिटलमधून मिळाली आहे. आम्ही लक्ष ठेऊन आहोत’, असे रूबी हॉस्पिटलचे  डॉक्टर परवेझ ग्रँट म्हणाले.