मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे, मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती. कोरोना संकट वाढल्याने, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे खबरदारी म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. ही मागणी मान्य करून एमपीएससी परीक्षा परीक्षेच्या दोन दिवस आधीच पुढे ढकलली गेली. सरकारने परीक्षा पुढे ढकलत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिला. मात्र, आता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी करायचं काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
दरम्यान, ओबीसी समाज देखील आरक्षण अबाधित राहावं, मेगा भरतीसह स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेतल्या जाव्यात यासाठी रस्त्यावर उतरला होता. आता, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी या परीक्षांबाबत महत्वाचा दावा केला. “एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या विषयावर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी या विषयवार चर्चा केली. येत्या दोन ते तीन दिवसांत एमपीएससीच्या परीक्षांची तारीख जाहीर होईल,” अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. यासंदर्भात मराठीतील अग्रगण्य टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे.