‘थयथयाट केल्याने मेलेले परत येणार नाहीत, आम्ही काहीच करू शकत नाही’; भाजप मुख्यमंत्र्याचं बेताल वक्तव्य

118

देशात कोरोना रूग्ण संख्या वाढत चालली असतानाच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बेजबाबदार विधान केलं आहे. थयथयाट केल्याने मेलेले लोक परत येणार नाहीत. हे नैसर्गिक संकट आहे. आम्ही काहीच करू शकत नाही, असं धक्कादायक, बेजबाबदार विधान मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केलं आहे.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मनोहर लाल खट्टर रुग्णालयात आले होते. यावेळी पत्रकाराने त्यांना मृतांच्या आकड्यांवर प्रश्न विचारला. त्यावेळी खट्टर यांनी धक्कादायक विधान केलं.

ही वेळ आकड्यांवर लक्ष ठेवण्याची नाही. ज्यांचा मृत्यू झाला. ते आपल्या थयथयाटाने जिवंत होणार नाहीत. ही नैसर्गिक आपत्ती आहे. आम्ही काहीच करू शकत नाही, असे खट्टर म्हणाले. बेजबाबदार विधान केल्याने खट्टर यांच्या अडचणी वाढणार आहेत.

एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असे बेताल वक्तव्य करणे अयोग्य असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. जगातील कोरोना महामारीत अनेक राज्यांच्या आरोग्यव्यवस्था भुईसपाट झाल्या आहेत. त्या सावरायचं सोडून मुख्यमंत्र्यांनी असे बेताल वक्तव्य केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.