परभणी जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात दहा नवीन अत्याधुनिक सुविधा असलेली चारचाकी वाहने आज दाखल झाली आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या वतीने पोलिस दलाकरिता डायल 112 अंतर्गत दहा नवीन चारचाकी वाहने महिंद्रा बोलेरो बी-4, बीएस-6 उपलब्ध झाले आहेत.
या नवीन वाहनांचे पुजन अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सुनील ओव्हळ, मोटर परिवहन विभागातील पर्यवेक्षक सय्यद साजीद हुसेन,आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास घटनास्थळी पोलिसांना तातडीने पोचता यावे, सण – उत्सवांच्या काळात पेट्रोलिंगसाठीही अत्याधुनिक व सुसज्ज वाहनांची पोलिस दलास आवश्यकता होती. प्राप्त झालेल्या वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यात येणार आहे.
त्यानंतर या अत्याधुनिक वाहनांचे जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना वितरण करण्यात येणार असल्याचे समजते. नवीन दहा वाहनांमुळे परभणी पोलिस दल आणखी गतिमान होण्यास मदत होणार आहे.